31.3 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात मका पिकासाठी विशेष प्रकल्प;42 हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ

गोंदिया जिल्ह्यात मका पिकासाठी विशेष प्रकल्प;42 हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ

0
7

गोंदिया, दि.16 : गोंदिया जिल्ह्यात मका पिकाच्या वाढीस चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, यामुळे ४२ हजार शेतकरी कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. २०२५-२८ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत सुमारे १६,८०० हेक्टर क्षेत्रावर मका लागवड वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ४० शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यामध्ये सहभागी होणार आहेत. एकूण प्रकल्प खर्च सुमारे ₹३४०१.३९ लाख इतका असून त्यातील ८७ टक्के हिस्सा RKVY अंतर्गत उपलब्ध होणार आहे.प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके, प्रशिक्षण सत्रे आणि शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. १६,८०० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार असून २४ प्रशिक्षण सत्रे व ३१२ शेती शाळांद्वारे शेतकऱ्यांचे कौशल्यविकास होणार आहे.

तसेच ४० FPOsना ८० टक्के अनुदानावर यंत्रसामग्री बँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, मल्टीक्रॉप थ्रेशर, हॅपी सीडर यांसारख्या यंत्रांचा समावेश आहे. यामुळे शेती खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.या प्रकल्पात मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यावरही भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांशी ‘बायबॅक’ करार करण्यात येणार आहे. देवरी येथील उद्योगाद्वारे इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची खरेदी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, भात पिकाच्या तुलनेत मका पिकासाठी कमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याची सुमारे ५० टक्क्यांहून अधिक बचत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना भातापेक्षा अधिक नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.एकूणच, हा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मोठी चालना देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.