23.9 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home विदर्भ शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित

शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित

0
12

नागपूरदि. 17 जुलै 2026: ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गुरुवार, 16 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील 33/11 के.व्ही. कचारी सावंगा उपकेंद्र परिसरात 4 मेगावॅट क्षमतेचा अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला.

महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून, यामुळे 1,074 शेतक-यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.

या प्रकल्पाची उभारणी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. या सौर प्रकल्पामुळे कचारी सावंगा उपकेंद्राशी जोडलेल्या रिधोरा, खापरी कुटूंबा, घरतवाडा, गुजर खेडी, सबकुंड, कोकरडा, कचेरी सावंगा, बोरखेडी आणि पंचधर या नऊ गावातील सुमारे 1074 कृषी पंपांना दिवसा आठ तास अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते, ज्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. आता दिवसा वीज मिळाल्यामुळे सिंचनाचे नियोजन करणे सोपे होणार असून, त्याचा थेट फायदा पिकांच्या उत्पादनावर होणार आहे.

अशा मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पाची यशस्वी उभारणी करणे हे एक आव्हानात्मक काम होते. यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले. यामध्ये नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, नागपूर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे आणि चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांनी या संपूर्ण प्रकल्पावर बारीक लक्ष ठेवून तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा प्रकल्प अत्यंत कमी वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.

या सौर प्रकल्पाची प्रत्यक्ष उभारणी आणि त्यापुढील सर्व तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी काटोल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक सोनगडे, चाचणी विभागाचे बुंदे, कोंढळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश भगत आणि कनिष्ठ अभियंता अशिष कुलसंगे व वैष्णवी पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आज हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाला आहे. एम.के.एफ. ग्रीन एनर्जीज प्रा. लि. या संस्थेने अत्यंत दर्जेदार पद्धतीने या सौर प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत नागपूर ग्रामीण मंडळात 4 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ही केवळ सुरुवात असून, आगामी काळात अशा अनेक सौर प्रकल्पांद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कृषी वीज पुरवठा अधिक सक्षम आणि शाश्वत केला जाणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे केवळ शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, तर पर्यावरणपूरक ऊर्जेलाही चालना मिळणार आहे. कचारी सावंगा येथील या प्रकल्पामुळे काटोल तालुक्यातील कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी ऊर्जा मिळाली असून, स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे ‘शेतकरी समृद्धी’चे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडणार असल्याचे मनोगत मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी व्यक्त केले आहे.