25.7 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home विदर्भ गोंदियात मोकाट कुत्र्यांचा हैदोस! शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर काळजाचा थरकाप उडवणारा...

गोंदियात मोकाट कुत्र्यांचा हैदोस! शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला!

0
44
प्रभाग क्र. ४ मधील घटना; नगर परिषदेच्या ढिम्म कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप, चिमुरडी थोडक्यात बचावली!

गोंदिया:गोंदिया शहरात बेवारस आणि मोकाट कुत्र्यांची दहशत आता रक्ताच्या थारोळ्यात निष्पापांचे जीव घेण्यापर्यंत पोहोचली आहे. सकाळी अत्यंत उत्साहाने शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका ७ वर्षांच्या निरागस चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या हिंस्त्र कळपाने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये घडलेल्या या थरारक आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण गोंदिया शहरात कमालीची दहशत पसरली असून, नगर प्रशासनाच्या नाकर्तेपणावर नागरिकांकडून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ४ मधील रिंग रोडवरील मजारच्या मागे राहणारी ही सात वर्षांची चिमुरडी रोजच्या प्रमाणे गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयारी करून घराबाहेर उभी होती. ती स्कूल बस किंवा वाहनाची वाट पाहत असतानाच, परिसरात फिरणाऱ्या ५-६ भटक्या कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर अचानक हल्ला चढवला.कुत्र्यांनी तिला वेढून लचके तोडण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीने भीतीने आणि वेदनेने टाहो फोडल्यामुळे परिसरातील एका जागरूक महिलेने तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्या धाडसी महिलेने आरडाओरडा करत दगड मारून कुत्र्यांच्या टोळक्याला पळवून लावले. त्यामुळे या चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

घाबरल्यामुळे प्रकृती खालावली; चिमुरडी खाजगी रुग्णालयात दाखल

या भयंकर हल्ल्यात मुलगी शारीरिकदृष्ट्या किरकोळ जखमी झाली असली, तरी कुत्र्यांच्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात गेली आहे. भीतीमुळे तिची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

नागरिकांचा उद्रेक: आता तरी कारवाई होणार का?
शहरातील प्रत्येक गल्लीबोळात सध्या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य पसरले आहे. रात्री-अपरात्री तर सोडाच, पण आता लहान मुले भरदिवसा घराबाहेर खेळायला किंवा शाळेत जायलाही घाबरत आहेत. प्रभाग क्र. ४ मधील संतप्त नागरिकांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, जर तात्काळ या बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर नगर परिषदेवर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.आता तरी गोंदिया नगर प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहराला या दहशतीतून मुक्त करणार का? की आणखी एखाद्या निष्पापाच्या बळीची वाट पाहणार? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

प्रशासनाला थेट सवाल:“गोंदिया नगर परिषदेचे ‘श्वान निर्बीजीकरण’ आणि ‘भटके कुत्रे नियंत्रण’ पथक फक्त कागदावरच मर्यादित आहे का? निष्पाप लहान मुलांचे जीव धोक्यात आल्यावरच कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का? रस्त्यावरून चालणे आता गुन्हा ठरत चालला आहे, याला जबाबदार कोण?”