अर्जुनी-मोर.– तालुक्यातील बाराभाटी/ब्राम्हणटोला येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते १५ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाले. या उपकेंद्रामुळे बाराभाटीसह परिसरातील गावांना अधिक सक्षम, दर्जेदार व अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असून शेती, लघुउद्योग, व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, “ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वीज ही मूलभूत गरज आहे. शेतकऱ्यांना सक्षम सिंचन व्यवस्था, युवकांना उद्योग-व्यवसायाच्या संधी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. बाराभाटी येथील ३३ केव्ही उपकेंद्रामुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल. भविष्यातही ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न राहील.”
या कार्यक्रमाला जि.प. सदस्य यशवंत गणवीर, जि.प. सदस्या कविताताई कापगते, होमराज कापगते, महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पाटील , पं.स. सदस्य नाजुक कुंभरे, डोंगरवारताई, सरपंच चाकाटेताई, माजी सभापती प्रकाश गहाणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजू लोगडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक लेलेश शिवणकर,कृ.उ.बा.स.चे संचालक व्यंकट खोब्रागडे, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण विकासाला गती देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.





