चित्रा कापसे/ तिरोडा:आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापकांमागे लावलेला निलंबनाचा धसका आणि थेट कारवाईच्या बडग्याविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोणतीही पूर्वकल्पना किंवा शहानिशा न करता मुख्याध्यापकांवर होणाऱ्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघा’च्या वतीने गुरुवारी राज्यभरात काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
आश्रमशाळांमध्ये घडणाऱ्या विविध घटना, अपघात किंवा तांत्रिक बाबींसाठी कोणतीही चौकशी न करता थेट मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरून निलंबित केले जात असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. मुख्याध्यापक, अधीक्षक आणि वर्गशिक्षक हे शाळांचे आधारस्तंभ आहेत. नैसर्गिक किंवा अनपेक्षित कारणांमुळे घडणाऱ्या प्रसंगांचा ठपका केवळ मुख्याध्यापकांवर ठेवून ही कारवाई केली जात असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या आंदोलनात तिरोडा परिसरासह राज्यातील विविध विभागांतील आश्रमशाळांचे कर्मचारी, शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास संपूर्ण शैक्षणिक कामकाज ठप्प करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
कारवाई मागे घ्या, अन्यथा तीव्र लढा!
“शासनाने आधी आश्रमशाळांमधील रिक्त पदे, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि तुटपुंजा निधी या मूलभूत समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. ते सोडून केवळ मुख्याध्यापकांना बळीचा बकरा बनवणे अत्यंत चुकीचे आहे. हे अन्यायकारक निलंबनाचे आदेश तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात लढा अधिक तीव्र केला जाईल.”
— बामनराव रिंगणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ





