28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : अंमलबजावणीला वेग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : अंमलबजावणीला वेग

0
8

गोंदिया, दि.24 : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये योजनेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था योगेश भाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, अग्रणी बँकेचे एलडीएम तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्तीय बँकेमार्फत जिल्ह्यातील एकूण २१,०२० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २०,९१५ खात्यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीत योजनेअंतर्गत अपात्र ठरणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार नगरपालिका व नगरपंचायतीतील सदस्य व कर्मचाऱ्यांची तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया गतीमान करण्यात येणार आहे.
अॅग्रीस्टॅक (Agristack) अंतर्गत नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार असून यासाठी कृषी, महसूल व सहकार विभागाच्या समन्वयातून व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी ‘आपले सरकार’ केंद्र व CSC केंद्रामार्फत विशेष प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
योजनेअंतर्गत तक्रार निवारण यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज तपशील किंवा आधार माहितीसंदर्भात तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले की, “शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, बँक खाते लिंकिंग आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी.”

blank