गोंदिया, दि.25 : शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य यांचे 29 मे 2026 चे पत्रान्वये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 15 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats प्राप्त झालेले आहे. हे महत्वपूर्ण सामाजिक काम शासनाच्या संबंधित सर्व विभागाचा सहभागाने करण्याबाबत निर्देश आहेत. सर्व संबंधित विभागातील सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात मदत करण्याबाबत आदेशित करण्याबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश आहेत. या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे सर्वेक्षण राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
तालुक्यातील सर्व विभागाच्या ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच ज्या काही योजना व इतरही काही सुविधा विभागांकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या उपलब्ध करुन द्याव्यात, जेणेकरुन सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी होईल. विशेषतः शहरी भागात भिक मागणारे, भटके कुटुंबातील बालके आढळतात, अशा बालकांचे सर्वेक्षणाकरीता नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देऊन अशा बालकांचा शोध घेण्याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश आहेत.
सर्वेक्षण दि.24 जुलै 2026 रोजी शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध घेण्याकरीता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे, जिल्हा समन्वयक बालरक्षक कुलदीपिका बोरकर, विषय साधन व्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी, ता. गोदिया येथे प्रत्यक्षात जाऊन भेट दिली.
अण्णाभाऊ साठे नगर (कुड्या) व गोंडीटोला कटंगी या वस्तीतील कुटुंब प्रमुख, महिला, किशोरवयीन मुली, मुले, वरिष्ठ नागरीक व 3 ते 18 वयोगटातील बालके या सर्वांसोबत डायटचे प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जे मुले वस्तीत आढळली त्यांना शाळेत नियमित जाण्याबाबत विनंती करण्यात आली. काही मुला-मुलींना सायकलची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. करीता सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, ज्यांच्या चांगल्या सायकल घरी आहेत, ज्या वापरात नाही त्यांनी सदर मुलांसाठी द्याव्या असे आवाहन डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे व शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे यानी केले आहे.
शासनाच्या ज्या सुविधांचा लाभ देणे शक्य होईल त्या सुविधा योजना सदर बालकांपर्यंत पोहचविण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी वस्ती प्रमुखांना सांगितले. सविता बेदरकर यांनी संपूर्ण वस्तीतील पालकांशी संवाद घडवून आणला, तेथील समस्यांबाबत माहिती दिली. तेथील स्थानिक अंगणवाडीमध्ये सुध्दा भेट देण्यात आली.
अण्णाभाऊ साठे नगर (कुडवा) व गोंडीटोला कटंगी या दोन्ही वस्तीतील प्रमुखांना विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आलेली आहे, जेणेकरुन आवश्यक त्या सुविधा बालकांपर्यंत पुरविणे शक्य होईल. सदर वस्तीमध्ये प्रत्यक्ष भेटी दरम्यान जवळपास 20 ते 25 विद्यार्थी अनियमित असल्याचे निदर्शनास आले. सदर सर्व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत पालकाचे समुपदेशन करण्यात आले.





