29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ मातृभाषेतील लोकसाहित्य समाजाला दिशादर्शक- डॉ.रणधीर शिंदे

मातृभाषेतील लोकसाहित्य समाजाला दिशादर्शक- डॉ.रणधीर शिंदे

0
11

जागृत संस्थेतर्फे ‘जाणीव-२०२६’ युवा नेतृत्व शिबिर

चंद्रपूर :आदिवासी बोली, भाषा आणि संस्कृती हे आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आहे. मातृभाषा आणि समाज हेच आपले खरे विद्यापीठ असते. आपल्या भाषेचा सन्मान करत लोकसाहित्याचे जतन केले तर समाजाला दिशादर्शक ठरते. त्यामुळे लोकसाहित्याचे पुढील पिढ्यांसाठी दस्तावेजीकरण करण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख तथा प्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नव्या पिढीमध्ये सामाजिक सजगता, शैक्षणिक जागृती व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने जागृत संस्थेतर्फे आयोजित तीन दिवसीय तिसरे युवा नेतृत्व शिबिर व शैक्षणिक कार्यशाळा ‘जाणीव-२०२६’ नुकतीच चंद्रपूर येथील विकास केंद्रात उत्साहात पार पडले, त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील माडिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम समाजातील ४० आदिवासी विद्यार्थी युवक-युवतींनी शिबीरात सहभाग घेतला. शिबिरात नवरगावचे प्रसिद्ध नाट्यलेखक व दिग्दर्शक सदानंद बोरकर यांनी कलाक्षेत्रातील संधी व कलावंतांची सामाजिक भूमिका स्पष्ट केली. नागपूरचे ॲड. सचिन मेकाले यांनी कायद्याचे शिक्षण आणि सामाजिक न्याय यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर सेलचे प्रमुख मुजावर अली यांनी डिजिटल सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकार राजेश मडावी यांनी पत्रकारितेतील संधी आणि सामाजिक दृष्टीकोन, तर नागपूरचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रत्नाकर शिरसाट यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. नेचर फाऊंडेशनचे नीलेश नन्नावरे यांनी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमधील उच्च शिक्षणाच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. मॅजिक उपक्रमाचे प्रमुख श्रीकांत एकुडे यांनी आदिवासी तरुणांच्या सकारात्मक शैक्षणिक वाटचालीबाबत संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण येरमे आणि शारदा येरमे यांनी आदिवासी संस्कृती व परंपरा जतन करण्याची गरज अधोरेखित केली. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्स बंगळुरूचे विद्यार्थी सुमीत काकडे यांनी सोनूर्ली ते बंगळुरूपर्यंतच्या उच्च शिक्षणाच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगितली. तर अशोका विद्यापीठ, दिल्लीचे यंग इंडिया फेलो नामदेव देवकते यांनी देशातील नामांकित विद्यापीठांतील शिक्षणपद्धती, संधी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध फेलोशिपविषयी माहिती दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जागृत संस्थेचे संचालक वर्षा कोडापे, अविनाश पोईनकर, राम चौधरी यांच्यासह चिन्ना महाका, निखील गेडाम, राजू काळंगा, भीमराव कोडापे, बुकलू लेखामी, रोहिणी ठोंबरे, वैशाली गेडाम, सुरज दहागावकर, निखिलेश चामरे, शुभम वडस्कर, क्रांतीवीर सिडाम आणि समीक्षा कुरेकर यांनी परिश्रम घेतले.

blank