अर्जुनी-मोर. –महायुती सरकारच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांची यादी संबंधित संस्थास्तरावर उपलब्ध झाली असून, सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाच्या सदस्या तथा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नजीकच्या सीएससी (CSC) सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण (e-KYC) करून घ्यावे. तसेच ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर मिळालेली पावती संबंधित सहकारी संस्था अथवा बँकेत तात्काळ जमा करावी, जेणेकरून कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल.
रचनाताई गहाणे यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असून कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधितांनी विलंब न करता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी.
यावेळी त्यांनी सर्व कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, “आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.





