स्थानिक गुन्हे शाखेकडून ५ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; महिलेला घेतले ताब्यात
गोंदिया:जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा-सौंदड रेल्वे स्टेशन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून एका महिलेच्या घरातून तब्बल ५ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रविवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, फुटाळा-सौंदड रेल्वे स्टेशन परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवल्याची पक्की बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकला. घरझडती घेतली असता पोलिसांना ५.८०० किलो गांजा आढळून आला.याप्रकरणी पोलिसांनी अनिता अशोक मोहनकर (वय ५३) हिला ताब्यात घेतले आहे. हा गांजा कुठून आणला गेला, याचा पुरवठादार कोण आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या तपासातून अंमली पदार्थांच्या तस्करीची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित जंगमवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईनंतर परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून पोलीस आता तस्करीच्या मुख्य म्होरक्याचा शोध घेत आहेत.





