25.7 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ धान खरेदीची मर्यादा वाढवा; आमदार राजकुमार बडोले यांची अन्न व नागरी पुरवठा...

धान खरेदीची मर्यादा वाढवा; आमदार राजकुमार बडोले यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

0
32

मुंबई (२८ जुलै) : अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत होणाऱ्या धान खरेदीची मर्यादा तत्काळ वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा स्थानिक आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले.

मर्यादेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान आमदार बडोले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील बहुतांश आदिवासी शेतकरी आपले धान पिकाचे उत्पादन आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर विकतात. मात्र, सध्या प्रशासनाकडून धान खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेली मर्यादा अत्यंत तोकडी आहे. या मर्यादेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण धान पिकाची शासकीय केंद्रावर विक्री करता येत नाही. परिणामी, उर्वरित धान व्यापाऱ्यांना कमी दराने विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये धान उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांचे हे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी शासनाने धान खरेदीची ही मर्यादा तातडीने वाढवणे गरजेचे आहे. खरेदी प्रक्रियेत कोणत्याही पात्र शेतकऱ्याला या मर्यादेचा फटका बसू नये आणि तो विक्रीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी विनंतीही आमदार बडोले यांनी पत्राद्वारे केली.

हमीभाव मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा भेटीदरम्यान आमदार बडोले यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर मतदारसंघातील धान उत्पादकांच्या इतरही अनेक समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या पिकाला योग्य शासकीय हमीभाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने या मागणीवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

blank