30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Featured News सपोर्ट विंग्सतर्फे गोंदियात ‘लव्ह विदाऊट लँग्वेज’ उपक्रम उत्साहात; मुक्या प्राण्यांची सेवा करत...

सपोर्ट विंग्सतर्फे गोंदियात ‘लव्ह विदाऊट लँग्वेज’ उपक्रम उत्साहात; मुक्या प्राण्यांची सेवा करत तरुणाईने जपली संवेदनशीलतेची परंपरा

0
14

गोंदिया:युवाशक्तीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘सपोर्ट विंग्स’ या सामाजिक संस्थेच्या वतीने गोंदिया शहरात २६ जुलै रोजी ‘लव्ह विदाऊट लँग्वेज’ (Love Without Language) हा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या तरुण स्वयंसेवकांनी एकत्र येत गोमातेला घास भरवून प्राणिमात्र आणि निसर्गाप्रती दया, करुणा व आपुलकीची भावना व्यक्त केली.

निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर, सहअस्तित्व आणि निस्वार्थ सेवेची भावना जोपासणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. शब्दांच्या पलीकडे जाऊन कृतीतून प्रेम व्यक्त करत तरुणांनी समाजात संवादापेक्षा कृतीतून दाखवलेल्या संवेदनशीलतेचा संदेश दिला.याप्रसंगी बोलताना सपोर्ट विंग्सच्या संचालिका दिया कोठारी म्हणाल्या, “दया आणि करुणा ही अशी भाषा आहे, जी जगातील प्रत्येक सजीवाला समजते. ‘लव्ह विदाऊट लँग्वेज’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तरुणांना आपल्या कृतीतून प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी प्रेरित करत आहोत, जेणेकरून समाजात प्राणिमात्रांबद्दल बंधुभाव व काळजी घेण्याची वृत्ती वाढीस लागेल.”

८० हून अधिक शहरांत युवा नेतृत्वाचा ठसा

‘सपोर्ट विंग्स’ ही संस्था भारतातील ८० पेक्षा जास्त शहरांमध्ये कार्यरत असून, तरुण पिढीला नेतृत्व विकास, इंटर्नशिप आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जबाबदार ‘चेंजमेकर्स’ (बदल घडवणारे नागरिक) म्हणून घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. गोंदियातील या उपक्रमाने पुन्हा एकदा लहानातील लहान कृतीतूनही समाजावर मोठा व सकारात्मक परिणाम घडवता येतो, हे सिद्ध करून दाखवले आहे.