महसूल दिन हा जनसेवा व समर्पणाचा गौरव करणारा दिवस
गोंदिया,दि. १ ऑगस्ट २०२६-“महसूल दिन हा केवळ एक शासकीय सोहळा किंवा औपचारिक दिवस नसून, तो महसूल प्रशासनाच्या जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाचा, जबाबदारीचा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा गौरव करणारा दिवस आहे,” असे प्रतिपादन महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष प्र. रामटेके यांनी व्यक्त करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिना’चे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महसूल विभागाचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि उद्योजकांना विविध आवश्यक शासकीय सेवा पारदर्शक, तत्पर व जबाबदारीने देण्याचे कार्य महसूल यंत्रणा अविरतपणे करत आहे. शासन आणि जनतेमधील एक महत्त्वपूर्ण आणि मजबूत दुवा म्हणून महसूल विभाग कार्य करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या वापरासह लोकाभिमुख सेवेचा संकल्प
बदलत्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पारदर्शकता आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून जनतेचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्याचा संकल्प महसूल दिनानिमित्त गोंदिया जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “जिल्ह्यातील सर्व कार्यरत महसूल अधिकारी, कर्मचारी, निवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि महसूल विभागाशी संबंधित सर्व घटकांच्या योगदानाला आम्ही मनःपूर्वक सलाम करतो. महसूल विभाग अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक आणि जनहितैषी होवो, हीच आमची सदिच्छा आहे.”महसूल दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिक, महसूल अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संघटनेतर्फे उत्स्फूर्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





