देवरी-देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल मुरपार (सुंदरीदंड) या गावात आजही पायाभूत सुविधांचा मोठा अनुशेष पाहायला मिळत आहे. गावात बस सेवा उपलब्ध असूनही केवळ ‘बस थांब्या’ची (यात्री प्रतीक्षालय) सोय नसल्याने चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांना आणि इतर प्रवाशांना भर उन्हात तसेच धो-धो पावसात उघड्यावरच बसची वाट पाहावी लागत होती. प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पाहून अखेर गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत अनोखा मार्ग शोधून काढला आहे.
लाकडे, झाडांच्या फांद्या आणि स्थानिक साहित्याचा वापर करून गावकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून एक तात्पुरते ‘छपराचे बस स्थानक’ उभारले आहे. या उपक्रमामुळे आता लहान मुले, वृद्ध आणि इतर प्रवाशांचे ऊन-पावसापासून रक्षण होण्यास मदत होणार आहे.
इच्छाशक्तीपुढे सरकारी बजेटही फिके!
गावाचे सरपंच लखनलाल पंधरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग आदिवासी बहुल असल्याने अनेक मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहे. गावातून देवरी मुख्यालय व इतर भागात जाण्यासाठी बस उपलब्ध असली तरी निवाऱ्याची सोय नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. ही अडचण लक्षात घेऊन गावकऱ्यांनी कोणाच्याही मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून हे छपराचे प्रतीक्षालय तयार केले. गावकऱ्यांच्या या आत्मनिर्भरतेने हे सिद्ध करून दाखवले आहे की, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही सरकारी निधीशिवाय किंवा लोकप्रतिनिधींच्या मदतीशिवाय मोठ्या समस्यांवर तोडगा काढता येतो.
गावकऱ्यांचा हा अनोखा उपक्रम आसपासच्या परिसरासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. मात्र, “गावकऱ्यांच्या या पुढाकारातून तरी सुस्तावलेले प्रशासन काही धडा घेणार का?” हा मुख्य प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.





