नागपूर : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखी वेळेत पोहोचावी यासाठी नागरिकांनी आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे. यासाठी झिरो माईल्स येथील एनएसएच (NSH) बुकिंग काउंटरवर २४ तास बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतासह परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना राखी वेळेत पोहोचविण्यासाठी टपाल विभागामार्फत विविध विश्वासार्ह व परवडणाऱ्या सेवा उपलब्ध आहेत. देशांतर्गत राखी, भेटवस्तू, मिठाई, कपडे व अन्य साहित्य पाठविण्यासाठी डोमेस्टिक पार्सल सेवा, तर राखी व महत्त्वाची कागदपत्रे निश्चित कालावधीत पोहोचविण्यासाठी स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध आहे. तसेच परदेशातील नातेवाईकांसाठी आंतरराष्ट्रीय मेल व आंतरराष्ट्रीय पार्सल सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पार्सल पॅकिंगची सुविधादेखील पोस्ट कार्यालयात उपलब्ध आहे.
रक्षाबंधनाच्या काळात टपाल व पार्सलच्या वाढत्या प्रमाणाचा विचार करून नागपूरच्या झिरो माईल्स येथील एनएसएच बुकिंग केंद्रावर २४x७ बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. राखीसाठी स्वतंत्र बुकिंग काउंटरही कार्यान्वित करण्यात आला असून, ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्राहकांनी वस्तूंचे योग्य पॅकिंग करावे, पिनकोडसह संपूर्ण व अचूक पत्ता नमूद करावा आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राखीची पाठवणी वेळेत बुक करावी, असे आवाहन रेल्वे मेल सर्व्हिसेस, नागपूरचे अधीक्षक यांनी केले आहे.
पात्र टपाल सेवांसाठी ऑनलाइन ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध असून, नागरिकांनी टपाल विभागाच्या सेवांचा लाभ घेऊन आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू आणि सणाच्या शुभेच्छा सुरक्षित व वेळेत पोहोचवाव्यात, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.





