24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधा; बिरसा मुंडांच्या विचारांनी पुढे जा – आमदार...

शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधा; बिरसा मुंडांच्या विचारांनी पुढे जा – आमदार राजकुमार बडोले

0
8

अर्जुनी मोरगाव येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त समाजप्रबोधन मेळावा व विद्यार्थी सत्कार सोहळा

अर्जुनी मोरगाव ,०९ ऑगस्ट– शिक्षण, संघटन आणि आपल्या हक्कांविषयी जागरूकता हीच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. आपण विकासाच्या प्रवाहात काही प्रमाणात मागे असलो तरी भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. जल, जंगल आणि जमीन यासाठी आदिवासी समाजाने मोठा संघर्ष व बलिदान दिले आहे. भारतीय संविधानामुळे आपल्या हक्कांना संरक्षण मिळाले असून, या अधिकारांवर कोणतीही गदा येऊ नये यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोलेनी केले.विश्व आदिवासी दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव येथे आयोजित समाजप्रबोधन मेळावा व आदिवासी विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते.

यावेळी आमदार बडोले म्हणाले की, आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता ही आपली मोठी ताकद आहे. आधुनिक शिक्षण आणि विकास स्वीकारतानाच आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक युवक-युवतीने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत मोठे स्थान निर्माण करावे. शिक्षणामुळे आपल्याला आपल्या घटनात्मक अधिकारांची जाणीव होईल आणि आपल्या हक्कांसाठी सक्षमपणे आवाज उठविता येईल.

आपल्या समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावा. केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता शिक्षण, कौशल्य आणि कष्टाच्या बळावर समाजातील प्रत्येक घटकाने प्रगती साधली पाहिजे. भविष्यातील पिढ्यांचा विचार करून समाजहिताला प्राधान्य देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन आमदार बडोलेनी केले.

आदिवासी समाजाच्या प्रलंबित वनहक्क जमिनींच्या पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.कार्यक्रमात आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करत आमदार बडोले यांनी सत्कारार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य डॉ. नाजुक कुंभरे, होमराज पुस्तोडे, फुलचंद बागडेरिया, भाग्यश्री सयाम, सविता कोडापे, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, माजी सभापती तानेश ताराम, आदिवासी संघटनेचे युवाध्यक्ष मंगेश भलावी, माजी जि.प. सदस्य रतिराम राणे, नगरसेविका सपना उपवंशी, शिला उईके, सुनीता कोकोडे, बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष लीलाधर ताराम, आदिवासी कंवर समाजाचे अध्यक्ष सुनेर सोनटपर, बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सोमदाश गणवीर, पीपल फेडरेशनचे अध्यक्ष राजकुमार गेडाम, माजी पं.स. सदस्य जागेश्वर भोगारे, पी.एस. कुंभरे, हरिचंद उईके, लक्ष्मीकांत मडावी, मुरारी पंधरे, भुवन औराशे, पराग कापगते, नाना शहारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

blank