चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील सोनेंगाव-बिबीटोला परिसरात मागील एक-दोन आठवड्यांपासून बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या हालचाली तसेच हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती.
ग्रामस्थांची वाढती चिंता लक्षात घेऊन वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवली. अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नांना यश आले असून दहशत निर्माण करणाऱ्या मादी बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच सोनेंगाव-बिबीटोला तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे शेतात ये-जा करणे, शेतीची कामे करणे तसेच दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सतर्कता व तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.वन विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आहेत.





