गोंदिया, दि.10 : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC), कर्ज खाते पडताळणी व मार्गदर्शन शिबीर आज गोंडवाना गोटूळ, चिचगड येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरास सुमारे 2500 शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास आमदार संजय पुराम, देवरी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, देवरी तहसीलदार धनंजय देशमुख, चिचगड तहसीलदार नवनाथ कातकडे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राजविलास बोरकर, चिचगड ठाणेदार जनार्दन हेगडकर, गटविकास अधिकारी देवरी, तालुका कृषी अधिकारी देवरी, तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व प्रमुख बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC), कर्ज खात्यांची पडताळणी, बँकनिहाय मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची तपासणी व लाभार्थी समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. विविध बँकांनी स्वतंत्र हेल्प डेस्क उभारून लाभार्थ्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमात आमदार संजय पुराम यांनी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन व बँकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी समन्वय राखण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभाग, सहकार विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व ग्रामपंचायती तसेच एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटीव्ह बँक लिमिटेड देवरी व कॅनरा बँक देवरी यांनी मोलाचे सहकार्य केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी, बँक प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानले.





