25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ निंबा येथे जागतिक आदिवासी दिवस व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कलाकारांचा मेळावा

निंबा येथे जागतिक आदिवासी दिवस व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कलाकारांचा मेळावा

0
3

विविध गावांतील कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रशस्तीपत्र व काजू रोपटे देऊन कलाकारांचा सन्मान.

गोरेगाव,दि.१०ः :तालुक्यातील ग्राम पंचायत निंबा येथे रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय तालुकास्तरीय कलाकारांचा मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लक्ष्मण भगत, अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद गोंदिया होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन रामेश्वर महारवाडे, उपसभापती पंचायत समिती गोरेगाव, पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती वर्षाताई विजय पटले, उपसरपंच नंदलाल उईके, तंटामुक्त समिती अध्यक्ष बुधराम बिजेवार, संजय शहारे, संगीता कुंजाम , मालता भगत, पुष्पा पटले ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, लक्ष्मीकांत साखरे, विविध गावांतील भजनी मंडळे व कलाकार तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध गावांतून आलेल्या कलाकार व भजनी मंडळांनी लोककला, लोकगीत, भजन, शाहिरी तसेच सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या लोकाभिमुख उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. ग्राम पंचायत निंबा यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविले जात असून, कला व संस्कृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना ग्राम पंचायत निंबा यांच्या वतीने प्रशस्तीपत्र व काजूचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. कलाकारांच्या कलेचा गौरव करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील कलावाटचालीसाठी सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी शुभेच्छा दिल्या.यापुढेही कलाकारांना प्रोत्साहन देणारे, सामाजिक जनजागृती करणारे व लोकाभिमुख कार्यक्रम ग्राम पंचायत निंबा यांच्या वतीने सातत्याने आयोजित केले जातील, अशी ग्वाही सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार, भजनी मंडळे व ग्रामस्थांचे त्यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेश भगत व राहुल पंधरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच नंदलाल उईके यांनी केले.

blank