मुंबई : दलित पँथर चळवळीच्या सामाजिक आणि ऐतिहासिक संघर्षावर आधारित ‘मिशन पँथर 1970’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अभिता फिल्म प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटाचे निर्माते तथा अभिता फिल्म प्रॉडक्शन्सचे CEO सुनील शेळके आणि दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.
‘मिशन पँथर 1970’ हा चित्रपट 1970च्या दशकात अन्याय, सामाजिक विषमता आणि शोषणाविरोधात तसेच सामाजिक न्यायासाठी उभ्या राहिलेल्या दलित पँथर चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चळवळीने अन्यायाविरोधात आवाज उठवत सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला नवी दिशा दिली. या ऐतिहासिक चळवळीचा संघर्ष, विचार आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अंजली पाटील, कैलास वाघमारे, कमलेश सावंत, संदेश जाधव, विनीत शर्मा, किरण बागडे, पार्थ तिवारी अंकुश गेडाम आणि गणेश देशमुख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे दमदार कलाकारांची फळी आणि सामाजिक आशय यामुळे ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मराठी भाषेत मर्यादित न राहता हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मिशन पँथर 1970’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण भारतात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यापूर्वी सुनील शेळके यांच्या निर्मितीतील ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला होता. त्यानंतर आता सामाजिक न्यायाच्या चळवळीतील महत्त्वाचा अध्याय असलेल्या दलित पँथर चळवळीवर आधारित ‘मिशन पँथर 1970’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून, सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाच्या लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





