26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ जलसंधारणाची कामे गुणवत्तापूर्वक नसल्यास संबंधितांवर कारवाई करावी : जिल्हाधिकारी मंदार पत्की

जलसंधारणाची कामे गुणवत्तापूर्वक नसल्यास संबंधितांवर कारवाई करावी : जिल्हाधिकारी मंदार पत्की

0
50

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जलसंधारण योजनांचा आढावा; 2047 कामे पूर्ण
गोंदिया, दि.12 : जलसंधारणाची कामे गुणवत्तापूर्वक नसल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत दिले.जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत विशेष निधी व अभिसरणातून मंजूर 2059 कामांपैकी 2047 कामे पूर्ण झाली असून विशेष निधीतील एक काम प्रगतीपथावर आहे. 2046 कामांची माहिती जिओ-पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून 2035 कामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत यांनी जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मंदार पत्की यांना दिली.
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी सभागृहात बुधवारी घेण्यात आला, त्यावेळी श्री पत्की यांनी निर्देशित केले.
मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राऊत यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीची माहिती यावेळी सादर केली. या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथ दोंतुला, उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित अडसूळ, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 91.63 टक्के खर्च करण्यात आलेला आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक 2.0) अंतर्गत पाच प्रकल्पांमधील 894 कामांपैकी 865 कामे पूर्ण झाली असून 14 कामे सुरू आहेत. या योजनेत आतापर्यंत 91.63 टक्के खर्च झाला आहे. वैयक्तिक लाभार्थी घटकांत 531.99 लाख रुपयांपैकी 530.91 लाख रुपये खर्च होऊन 99.80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती दिली.
गाळमुक्त धरण योजनेतून 4.35 लाख घनमीटर गाळ उपसा
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत सन 2025-26 व 2026-27 मधील 225 मंजूर कामांपैकी 106 कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून 4,35,586 घनमीटर गाळ काढण्यात आला असून जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. तसेच 675 शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.
लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना पूर्ण करण्यात आलेली आहे. संदर्भ वर्ष 2023-24 साठी 0 ते 2000 हेक्टर क्षमतेच्या लघुसिंचन प्रकल्पांची सातवी तसेच जलसाठ्यांची दुसरी प्रगणना शासन निर्णयानुसार यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
21 ऑगस्टला ‘जलसंधारण दिन’, आठवडाभर जनजागृती अभियान
स्वर्गीय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून 15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. राज्यभर जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

blank