24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ पतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी...

पतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

0
4
**तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी
*विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश*
*राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी*
*सर्व आश्रमशाळांची छायाचित्रांसह तपासणी; सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता व विद्यार्थी उपस्थितीवर विशेष लक्ष*
गडचिरोली, दि. १२  : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दुर्घटनेतील निष्काळजीपणासाठी जबाबदार संस्थाचालक व संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह लागू कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी तसेच आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज दिले.या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जपतलई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची येत्या १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करावी तसेच राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची पुढील तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी (थर्ड पार्टी ऑडिट) पूर्ण करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
*आश्रमशाळेच्या संपूर्ण परिसराची पाहणी*
मंत्री डॉ. उईके यांनी आज जपतलई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था, अंथरुण-पांघरुण व गाद्या, पिण्याच्या पाण्याची व फिल्टरची व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वयंपाकगृह, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध उपाययोजनांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून घटनेबाबत तसेच शाळेत उपलब्ध सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर दिला. “आदिवासी विकास विभाग पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे त्यांनी सांगितले.आश्रमशाळेतील निवास, पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता व विद्यार्थी सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्थेचा आढावा घेत ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
blank