नामांतरणाचा निर्णय महिनाभरात घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन; तुमसर आयटीआय प्रशासनाला आंदोलकांचा इशारा
तुमसर (प्रतिनिधी) : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामांतरण करण्यात यावे, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टपासून प्रस्तावित केलेले बेमुदत आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविंद्र गणवीर, शासकीय आयटीआय तुमसरचे प्राचार्य केतन सोनपीपरे व शिल्पनिदेशक संजय लोहे यांनी आंदोलकांशी घडवून आणलेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने हा मार्ग निघाला.
नामांतरणाचा शासन निर्णय त्वरित जारी व्हावा यासाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी १५ ऑगस्टपासून आयटीआय प्रांगणात बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून आंदोलकांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले.
आयटीआय प्राचार्य व जिल्हा अधिकारी रविंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून प्रशासन व आंदोलकांमध्ये समन्वय साधला. नामांतरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर आणि संबंधित समितीकडे विचाराधीन असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. माजी आमदार चरण वाघमारे यांच्या शिष्टाईमुळे आणि आयटीआय प्राचार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी नियोजित उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
तथापि, येत्या एक महिन्याच्या आत नामांतरणाबाबत शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांनी दिला आहे.
या बैठकीस व प्रसंगी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मनोज चौबे, सलमान पठाण, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बालचंद बोंद्रे, पत्रकार मोहन भोयर, विजय भुरे, पोलीस विभागाचे गिरीश पडोळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
”हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असून ते आमच्यासाठी वंदनीय आहेत. असे असतानाही शासकीय आयटीआय तुमसरला त्यांचे नाव देण्यास शासनाकडून एवढा विलंब होत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष पुरवून नामांतरणाबाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करावा.”
— चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्र.




