25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ ग्रामीण विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन

0
18

गोंदिया, दि. १३ : ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविणे, शाश्वत आजीविका निर्माण करणे आणि ग्रामविकासाला चालना देणे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे “विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५ (VBG RAM G)” या विषयावर जिल्हास्तरीय एकदिवसीय पंच संमेलन उत्साहात संपन्न झाले.

संमेलनाला उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) दर्शन निकाळजे, गट विकास अधिकारी (मनरेगा) ज्ञा. शा. लोहबरे, जिल्हा एमआयएस समन्वयककिशोर मादळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) सुरेखा ब्राम्हणकर, जितेंद्र पारधी, बीआरएलएफ समन्वयक नितेश बोपचे, तांत्रिक सहाय्यक राकेश बघेले व प्रविण खरवडे यांच्यासह सर्व पंचायत समित्या व तहसील कार्यालयांतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य तसेच व्ही बी जी रामजी (VBG RAM G) अभियानाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संमेलनात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५ मधील विविध तरतुदी, उद्दिष्टे आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला रोजगाराची हमी उपलब्ध करून देणे, शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामविकासाला गती देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतींचे सरपंच व पंच सदस्य यांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. मजुरांची नोंदणी, कामांचे नियोजन, ग्रामसभेच्या माध्यमातून विकासकामांना प्राधान्य देणे तसेच योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.संमेलनादरम्यान मनरेगा व व्ही बी जी रामजी (VBG RAM G) अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयातून काम करून ग्रामीण विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) दर्शन निकाळजे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य व संबंधित कर्मचाऱ्यांना  व्हिलेज ग्रामपंचायत प्लॅन (Village Gram Panchayat Plan) आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींच्या सहभागातून रोजगारनिर्मिती, शाश्वत विकास आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.संमेलनामुळे नव्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींची क्षमता वृद्धिंगत करणे आणि ग्रामीण भागातील रोजगार व आजीविका हमी अधिक बळकट करण्यासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

blank