**गडचिरोलीत उभारणार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’
*प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग; बोलीभाषेतील साहित्याच्या प्रकाशन व अनुवादाला शासनाचे पाठबळ*
*साहित्यिक, लेखक व कलावंतांशी साधला थेट संवाद*
गडचिरोली, दि. १३ : मराठी भाषेचे संवर्धन, स्थानिक बोलीभाषांचे जतन-संवर्धन, संशोधन आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’ उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज केली. तसेच गडचिरोलीसह पूर्व विदर्भाच्या समृद्ध झाडीबोली साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या झाडीबोली संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मराठी भाषा विभागाचा आढावा तसेच जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, नाट्यकर्मी आणि बोलीभाषा अभ्यासकांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात मंत्री डॉ. सामंत बोलत होते.
यावेळी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश तसेच सचिन सुपेकर, वासुदेव पोतदार, कुसुमताई आलाम, सदानंद बोरकर, प्रा. सिद्धार्थ डोंगरे, प्रा. युवराज प्रधान यांच्यासह जिल्ह्यातील विविध मराठी व बोलीभाषांतील साहित्यिक, लेखक, कलावंत आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग*
साहित्यिक, लेखक आणि कलावंतांच्या प्रश्नांना जिल्हास्तरावर तत्पर प्रतिसाद मिळावा तसेच मराठी भाषा विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविता याव्यात, यासाठी पुढील महिन्यापासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. या विभागासाठी स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी आणि आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे साहित्यिकांना आपल्या प्रश्नांसाठी आणि विविध योजनांच्या लाभासाठी थेट जिल्हास्तरावर यंत्रणा उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.





