25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ रानडुकरांच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी; उमरी व धादरी परिसरात भीतीचे वातावरण

रानडुकरांच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी; उमरी व धादरी परिसरात भीतीचे वातावरण

0
5

एकाच दिवशी तीन घटना; वन विभागानी उपाययोजनां करावी शेतकऱ्यांचीमागणी
चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील धादरी व उमरी परिसरात आज गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ पिसाळलेल्या रानडुकरांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या सलग तीन घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये तीन शेतकरी जखमी झाले असून, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे दाखल केले आहे.
उमरी येथील शेतात खरीप पिकांच्या कामात व्यस्त असलेल्या कलाबाई महेश मोहारे रा. सोनोली यांच्यावर दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचप्रमाणे धादरी येथील शेतात काम करीत असलेले इसुद्याल रावजी पटले रा. धादरी यांच्यावरही रानडुकराने अचानक हल्ला केला.
दरम्यान, दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास उर्मिला कृष्णकुमार पाटील रा. उमरी या शेतात काम करीत असताना त्यांच्यावरही रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या. त्यांना कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्याची माहिती असून, काही जखमींना चार ते पाच टाके लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी रानडुकरांच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्याने उमरी, धादरी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र, रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.प्रशासक अजितकुमार ठवरे व ग्रामस्थांनी वन विभागाने रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण आणावे, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वन विभागाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

blank