25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home गुन्हेवार्ता ढासगड येथे पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

ढासगड येथे पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

0
38

देवरी,दि,१५- देशात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आनंदात साजरा होत असताना देवरी तालुक्यातील ढासगड या पर्यटनस्थळी आज साडे तीन वाजेच्या सुमारास एक अप्रिय घटना घडली. या घटनेत प्रचंड वेग असलेल्या पाण्याच्या प्रवाहात आंधोळीचा मोह न आवरता आलेल्या दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. 

मृतांमध्ये  कृष्णा लखन कापगते (वय २१ वर्षे) आणि हेतराम गुलाब सयाम (वय २५ वर्षे) दोन्ही राहणार बोपाबोडी, तालुका सडक अर्जूनी यांचा समावेश आहे. वृत्त लिहीपर्यंत मृतदेहाचा शोध सुरू असून अंधारामुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन च्या चमूला पाचारण करण्यात आले आहे.

ढासगड येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. आज स्वातंत्र्यदिन सोहळा असल्याने पर्यटनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यात युवक मंडळी मोठ्या प्रमाणावर होती. ढासगड येथे नैसर्गिक सौदर्याची भरमार असून पाण्याचा धबधबा सुद्धा आहे. येथे खडकाळ भागातून प्रचंड वेगाने पाण्याचा झरा वाहतो. हा भाग प्रचंड जोखमीचा असून यापूर्वी अनेक घटना घडल्याने पोलिस प्रशासन आणि स्थानिक लोकांकडून पर्यटकांना वाहत्या पाण्यात खेळ वा आंधोळीसाठी सातत्याने मनाई केली जाते. पण या सूचनेकडे आजची तरूणानी नेहमी कानाडोळा करत आल्याने अनेक कुटुंबावर याचे परिणाम भोगण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. आजही सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना कृष्णा आणि हेतराम हे विसीतले तरूण बेधुंद होऊन आंधोळीसाठी पाण्यात उतरले. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेले.

दरम्यान, चिचगड पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून तपास मोहीम अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येते.