25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ देसाईगंज शहरात रात्री भरणाय्रा कार्नर सभांवर बंदी घालण्याची गरज !

देसाईगंज शहरात रात्री भरणाय्रा कार्नर सभांवर बंदी घालण्याची गरज !

0
42

पोलीस निरिक्षक स्वप्नील इज्जपवार यांचेंकडुन सार्थ अपेक्षा

गडचिरोली (देसाईगंज) दि.१६-पुर्व विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणुन ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात मागील दोन वर्षापासुन पोलीसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नाही .मुख्य बाजारपेठेतील वर्दळीच्या ठिकाणी चौका-चौकात तसेच सानसुन परिसरात देखील व्यसनाधिन व्यक्तींच्या कार्नर सभेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजु झालेले पोलीस निरिक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी देसाईगंज शहरात रात्री साडे दहानंतर शहरात भरणाय्रा कार्नर सभांवर कायम बंदी घालावी अशी मागणी सुजान नागरीकांकडुन जोरकसपणे केल्या जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज हे शहर मायानगरी म्हणुन ओळखल्या जाते.एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मागील दोन वर्षापासुन शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य दारु, सट्टा, लॉटरी मादक द्रव्याचे विक्री, सुगंधी तंबाखू, जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ करून विक्री करणे या अवैद्य धंद्याना प्रचंड ऊत आला आहे.या अवैद्य व्यावसायिकांवर स्थानिक पोलीसांचा मुळीच वचक राहिला नाही.मागील दोन वर्षांपासून ठाण मांडून बसलेले पोलीस स्टेशन देसाईगंज येथील सहायक अधिकारी केवळ अवैध वसुलीसाठी अवैध व्यावसायिकांवर दहशत ठेवून वसुलीत दंग झाले आहेत.यामुळेच अवैध व्यावसायिकांवर आतापर्यंत मोठी कारवाई झाली नसल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.
मागील दोन वर्षांपासून शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.मात्र, चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.देसाईगंज शहरातील पानठेले, हॉटेल, दुकान यांच्यावर वेळेचे निर्बंधच नसल्याने रात्री उशिरा पर्यंत चौका-चौकात कार्नर सभा रंगत असल्याने रात्रपाळीवरील गस्तातील पोलीसांना चोरांना ओळखण्यात प्रचंड अडथळा निर्माण होत असतो.
शहरासह तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना काही सहायक अधिकारी यांचेकडून तुर्तास अभयदान मिळत असल्याने शहरातील युवक व्यसनाच्या फारच आहारी गेल्याचे निदर्शनास आले आहे. देसाईगंज शहरातील मुख्य बाजार विभागात रात्री साडे दहानंतर संपुर्ण दुकाने बंद झाल्यावर वडसा रेल्वे स्थानक, निरंकारीभवन ते भगतसिंगवार्ड रोड, मुख्य बाजारपेठ परिसरात, जूने पंचायत समिती जवळील राजीव गांधी परिसरात,नगर परिषद शॉपिंगसेंटर मधील सुनसान व निर्जन स्थळी शालेय विद्यार्थी व युवक गांजा,चरस,ब्राऊन शुगर आदी मादक द्रव्ये धुम्रपानाद्वारे ओढून नशा करीत असल्याचे विदारक चित्र अनेकांना पहावयास मिळत आहे. शहरातील शालेय विद्यार्थी व युवक मादक द्रव्याच्या आहारी गेले असून आपले जीवन उद्वस्त करीत असल्याचे वास्तविक चित्र अनुभवयास मिळत असून भयानक परिस्थिती देसाईगंज शहरामध्ये निर्माण झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती बाजार विभागातील काही दुकाने फारच संशयास्पदीत सुरू असतात.काही कॅंन्फेक्शनरी व जनरल स्टोअर्सच्या आड प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूची खुलेआम विक्री केली जात आहे. या अवैध व्यावसायिकांवर मागील दोन वर्षांपासून पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेल्या दुय्यम दर्जाच्या सहायक अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे.या अवैध व्यवसायांना यांनीच हिरवा कंदील दाखवला असल्याचे अवैध व्यावसायिक गावभर सांगत फिरत आहेत.काही दुकाने हिरवा कापडी पडदा लावुन आतमध्ये युवक कॉम्पुटरवर बंदी घालण्यात आलेले गेम खेळत असल्याचे आढळतात.याच ठिकाणी अलिखित परवाना मिळाल्यासारखे खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय देखील जोमात सुरु आहे.पन्नास मिटर च्या अंतरावर देशी-विदेशी दारु खुलेआम विकल्या जात आहे,यावर देखिल वेळीच आवर घालण्याची नित्तांत गरज आहे.
शहरासह तालुक्यात जनावरे,रेती, मुरूम तस्करी व गौण खनिज उत्खनन, अवैध कत्तलखाने,लहान – लहान मुले दोन चाकी वाहन विना परवाना बिनधास्त चालवितात.मात्र या गंभीर प्रकरणाकडे निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील वाहतुक नियंत्रण करणारे पोलीस अक्षम्य दुर्लक्ष करित आहेत.अवैध प्रवासी वाहतूकीत प्रचंड वाढ झाली आहे.अनेक काळी पिवळी वाहने ,कमांडर, तीन चाकी ऑटो कालबाह्य झाली आहेत.ट्रॅव्हल्स प्रमाणे ट्रान्सपोर्ट देखील शहराच्या बाहेर ठेवणे आवश्यक आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या मुख्य मार्गावर तासंतास दुतर्फा पार्किंग करून ठेवत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील दोन वर्षांपासून शहरात पोलीस निरीक्षक होते का? असा चित्र शहरात कार्यरत दुय्यम दर्जाच्या सहायक अधिकाऱ्यांनी उभे केले होते.यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची मुकसंमती होती का? हाही प्रश्नच आहे.
शहरात या दुय्यम दर्जाच्या सहायक अधिकाऱ्यांमुळे पोलीस निरीक्षक नेमके कोण? असा सवाल आपसूकच उपस्थित होत असल्यामुळे पोलीस निरीक्षक हे पदच मागील दोन वर्षांपासून सपशेल प्रभावहीन होऊन पोलिस निरीक्षक पदाच्या अस्तीत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.याचा गैरफायदा घेत सहायक अधिकाऱ्यांची अर्थपुर्ण कमाई मागील दोन वर्षात जिल्ह्यातील कुठल्याही नियमित पोलीस निरीक्षकांनी केली नसेल तेवढी कमाई केली आहे,असेही खाजगीत आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बोलतात. चंद्रपूर,भंडारा व गोंदिया जिल्हा सीमेनजीकच्या देसाईगंज शहरासह तालुक्यात यामुळेच मागील दोन वर्षांपासून एकही मोठी कामगीरी न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षकांवरच निष्क्रियतेचा ठपका ठेवल्याने अवकाळी प्रशासनिक बदलीला नाहक बळी पडावे लागले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये आता नव्याने रुजु झालेल्या पोलीस निरिक्षक स्वप्नील इज्जपवार यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी विश्वास ठेवून देसाईगंज येथे पोस्टींग दिली आहे. शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून स्वप्नील इज्जपवार यांची पोलीस विभागात ख्याती आहे. देसाईगंज शहरातील व तालुक्यातील या गंभीर प्रकरणाबाबत कठोर पावले टाकत अवैध धंद्यावर कायम बंदी घालुन आपल्या “सद् रक्षणाय् ; खल् निग्रनाय” या कार्यशैलीतुन आगळी-वेगळी छाप पाडावी व शहरात कायदा व सुव्यवस्थेचे ‘वाली’ अद्याप जीवंत आहेत याची एक चुनुक नक्कीच दाखवावी, अशी सार्थ अपेक्षा देसाईगंज शहरातील जनता व्यक्त करित आहेत.