अर्जुनी-मोर. –तालुक्यातील मौजा कवठा येथील प्रसिद्ध कोकणाई माता देवस्थानाला अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, तसेच देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कवठा ग्रामपंचायतीच्या वतीने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कवठा, ता. अर्जुनी-मोर, जि. गोंदिया येथील कोकणाई माता देवस्थान हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून, या देवस्थानाला धार्मिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्याची पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. देवस्थानाच्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास रोजगाराच्या संधी
कोकणाई माता देवस्थानाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायासाठी नवीन संधी मिळतील. तसेच कवठा परिसराच्या विकासालाही मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. देवस्थान परिसरात रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज व्यवस्था, पार्किंग, निवास व्यवस्था यांसह अन्य आवश्यक पर्यटन सुविधा निर्माण करता येतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
देवस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासाची मागणी
कोकणाई माता देवस्थानाला अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून प्रस्ताव मंजूर करावा. तसेच देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा आणि कोकणाई माता देवस्थानाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी विनंती कवठा ग्रामपंचायतीने आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे केली आहे.कोकणाई माता देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असून, कवठा परिसराच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.




