गोंदिया:धावत्या ट्रेनमध्ये निर्माण झालेली अत्यंत गंभीर परिस्थिती, वैद्यकीय साधनांची कमतरता आणि पुढील स्थानक येण्यासाठी असलेला मोठा वेळ… अशा कठीण प्रसंगी दाखवलेले असामान्य धैर्य अन् समयसूचकतेच्या बळावर एका गरोदर महिलेची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या गोंदियातील आरोग्य सेविका राजश्री भोंडे (नेवारे) यांचा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विशेष नागरी सत्कार करण्यात आला.८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राजश्री भोंडे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
काय घडली होती घटना?
२४ जून २०२६ रोजी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ही थरारक घटना घडली होती. ट्रेन जळगाव स्थानक ओलांडून पुढे जात असताना एका गरोदर महिला प्रवाशाला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. पुढील स्टेशन गाठण्यासाठी बराच वेळ असल्याने ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.त्याच ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र काटी (उपकेंद्र मरारटोला) येथील आरोग्य सेविका राजश्री भोंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पुढाकार घेतला. पुरेशी वैद्यकीय साधने उपलब्ध नसतानाही स्वतःचा अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच महिलेची सुखरूप प्रसूती केली.
चाळीसगाव येथे तात्काळ वैद्यकीय मदत
प्रसूतीनंतर राजश्री भोंडे यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. ट्रेन चाळीसगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच आधीच सज्ज असलेल्या १०८ रुग्णवाहिकेद्वारे माता व नवजात बाळाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी पाठवलेल्या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी मंदार पत्की व निवासी उपजिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहरे यांनी या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनी या सत्काराचे आयोजन केले.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनीत दोन्तुला, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजश्री भोंडे यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे संपूर्ण आरोग्य वर्गातून आणि जिल्ह्यातून जोरदार कौतुक होत आहे.




