26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ जलसंधारण ही लोकचळवळ बनली तरच जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल : आमदार राजकुमार...

जलसंधारण ही लोकचळवळ बनली तरच जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल : आमदार राजकुमार बडोले

0
8

गोंदिया, 17: जलसंधारण सप्ताहानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कनेरी येथे जलपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार बडोले म्हणाले, जलसंधारण ही केवळ शासकीय योजना नसून ती लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला तरच जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल. त्यांनी जलसंधारणाचे महत्त्व विषद करत जल, मृदसंधारण आणि वृक्षारोपण या तिन्ही बाबींचा समन्वय साधून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

            या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जलसंधारण सप्ताहानिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, पोस्टर व रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच तालुका आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत पाऊलदौना येथील अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण करून जलसंधारण व मृदसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली.नागरिकांनी जलसंधारण सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून जलसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या आवाहनानुसार 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमात जलसंधारणाची शपथ घेण्यात आली आणि बोधचिन्हाचे विमोचन करण्यात आले.यानिमित्त जिल्ह्यातील सर्व तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये जलसंधारणाची शपथ घेण्यात आली असून सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.