चित्रा कापसे/तिरोडा- ‘तू आम्हाला पाहून का बरं हसला?’ या कारणावरून झालेल्या वादातून युवक व त्याच्या मित्रांना लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी तिरोडा शहरात घडली. या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास सी. जे. पटेल कॉलेजसमोरील शेंडे सलूनजवळ ही घटना घडली. पालडोंगरी येथील लोकेश मदनलाल प्रजापती (२५) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी ‘तू आम्हाला पाहून का बरं हसला?’ असे म्हणत वाद सुरू केला. त्यानंतर लोकेश व त्याच्या मित्रांना डोक्यावर, हात-पायांवर लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या मारहाणीत कार्तिक गजानन रहांगडाले (२३) आणि तेजस भरतलाल उरकुडे (२५), दोघेही रा. पालडोंगरी, हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी आरोपी रुद्र राकेश वाल्मिक (२२), रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा, गौरव दिलीप करोसी (२१), रा. रविदास वॉर्ड, तिरोडा आणि गौतम बुद्ध वॉर्ड, तिरोडा येथील एका १८ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), ११५(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास API दादास पाटील करीत आहेत.





