24.7 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियात शिंदे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्ष रूपेश कुथे यांच्यासह कार्यकर्ते जखमी

गोंदियात शिंदे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; जिल्हाध्यक्ष रूपेश कुथे यांच्यासह कार्यकर्ते जखमी

0
0

गोंदिया: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजी गुरुवारी रात्री गोंदिया शहरात उघडी पडली. होर्डिंग लावण्याच्या किरकोळ कारणावरून शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत शिवसेनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रूपेश (सोनू) कुथे यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी झाले असून, दोन्ही बाजूचे काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोवार बोर्डिंग परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. शहर परिसरात होर्डिंग लावण्यावरून जिल्हाध्यक्ष रूपेश कुथे आणि युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात कुथे यांच्या हाताला जबर दुखापत झाली.

जिल्हाध्यक्ष कुथे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे समर्थक घटनास्थळी जमा झाले. यानंतर कुथे समर्थक आणि युवासेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारहाण झाली. या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सत्ताधारी पक्षातील या अंतर्गत हाणामारीमुळे गोंदियाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.