; स्वतः आगीत भाजल्या, पण आगीच्या तांडवातून चिमुरड्यांना सुरक्षित बाहेर काढले
अमरावती,दि.२६: सोमवारी पहाटे साडेतीन वाजेची वेळ… संपूर्ण अमरावती शहर गाढ झोपेत असताना जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) अचानक मृत्यूचे तांडव उभे ठाकले. एका व्हेंटिलेटरचा अचानक भीषण स्फोट होऊन क्षणात धुराचे प्रचंड लोळ आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या. मात्र, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तिथल्या परिचारिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अचाट धाडसामुळे तब्बल ३६ नवजात शिशूंचे प्राण वाचले आहेत.
असा घडला थरार: नेहमीप्रमाणे अतिदक्षता विभागात परिचारिका ललिता कासदेकर व त्यांच्या सहकारी बालकांची शुश्रूषा करत असताना शांततेचा भंग करत एका व्हेंटिलेटरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा प्रभाव इतका तीव्र होता की छतावरील आपत्कालीन वॉटर सिस्टीम जळून खाक झाली आणि व्हेंटिलेटरचे तुकडे-तुकडे झाले. काहीच सेकंदात संपूर्ण कक्षात अंधार पसरला आणि गुदमरवून टाकणारा प्रचंड धूर भरला.
काचेच्या पेट्यांतून निष्पापांची सुटका: डोळ्यांसमोर भीषण आग आणि मृत्यू दिसत असताना, पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा सोपा मार्ग कर्मचाऱ्यांकडे होता. मात्र, काचेच्या पेटीत (इंक्युबेटर) बंद असलेल्या त्या निष्पाप चिमुरड्यांना सोडून जाण्यास त्यांचे मन मानले नाही. “स्वतःचे हात भाजले तरी चालेल, पण बालकांना मरू द्यायचे नाही” या एकाच जिद्दीने परिचारिका ललिता कासदेकर, त्यांच्या सहकारी परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी धुराच्या लोळात उडी घेतली.
जीव मुठीत धरून, एकापाठोपाठ एक अशा ३६ नवजात बालकांना त्या आगीच्या तांडवातून सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान कर्मचाऱ्यांचे हात भाजले आणि धुरामुळे श्वास गुदमरला, तरीही त्यांनी एकही पाऊल मागे हटवले नाही.
अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद: डफरीन रुग्णालयाच्या या देवदूतांनी दाखवलेल्या असीम धैर्यामुळे आज ३६ मातांची कुस उजळलेली राहिली आहे. या परिचारिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे व भूतदयाचे संपूर्ण अमरावती शहरातून, राजकीय वर्तुळातून आणि प्रशासनाकडून कौतुक होत असून, त्यांचे हे शौर्य अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.





