25 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राष्ट्रीय देश लोकसभा अध्यक्षांवर फेकले कागद, विरोधकांनी ओलांडली संसदेची मर्यादा

लोकसभा अध्यक्षांवर फेकले कागद, विरोधकांनी ओलांडली संसदेची मर्यादा

0
25
नवी दिल्ली, दि. 24 – विरोधकांनी गुरुवारी लोकसभेमध्ये पुन्हा एकदा संसदीय मर्यादा ओलांडली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी रागाच्या भरात भर सभागृहात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेने कागद फेकले. लोकसभा अध्यक्ष विरोधकांचा गदारोळ थांबवत सभागृहातील कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला आहे.
विरोधकांचा नोटाबंदी निर्णयाविरोधात गोंधळ सुरू होता. यावेळी लोकसभा अध्यक्ष ब-याच वेळापर्यंत विरोधकांना संसदेचे कामकाज सुरू करण्याचे आवाहन करत होत्या. मात्र, विरोधकांनी त्यांचे म्हणणे ऐकत नसल्याने त्यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली.
त्यानंतर आसनावर उठून निघून जात असताना तेव्हा सपा खासदार अक्षय यादव यांनी काही कागद त्यांच्या दिशेने भिरकावले, ज्यातील एक कागद अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर पडलादेखील. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून विरोधक संसदेत नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करत गदारोळ घालत आहेत. असाच गोंधळ घालत असताना लोकसभा अध्यक्षांवर कागद फेकण्यात आल्याची घटना घडली आहे.