24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home शैक्षणिक श्री शिवाजी सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात अस्वच्छता अन् निकृष्ट भोजन; विद्यार्थिनी आक्रमक, प्रशासनाकडे...

श्री शिवाजी सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात अस्वच्छता अन् निकृष्ट भोजन; विद्यार्थिनी आक्रमक, प्रशासनाकडे लेखी तक्रार

0
13

नागपूर (प्रतिनिधी): नामांकित श्री शिवाजी सायन्स कॉलेज धंतोली, काँग्रेसनगर येथील मुलींच्या वसतिगृहातील अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे भोजन आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थिनी आक्रमक झाल्या आहेत. मेसमधील अन्नात किडे व अळ्या आढळत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मेसच्या भोजनाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्वयंपाकगृहाची स्वच्छता ठेवली जात नसून अन्नाच्या सुरक्षिततेचे सर्व निकष धाब्यावर बसवले जात आहेत. धक्कादायक म्हणजे, या अस्वच्छतेविरोधात व निकृष्ट भोजनाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थिनींना कथितरीत्या धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी या प्रकाराचे छायाचित्रे व व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

विद्यार्थिनींच्या मुख्य मागण्या व आरोप:

  • किडेयुक्त भोजन: मेसमधील अन्नात वारंवार किडे, अळ्या आणि दूषित पदार्थ आढळत असल्याने आरोग्य धोक्यात.

  • अस्वच्छतेचे साम्राज्य: वसतिगृह परिसर आणि मेसचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ स्थितीत.

  • दबाव टाकण्याचा प्रयत्न: अन्नाच्या दर्जाबाबत तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावण्याचे प्रकार.

  • कडक कारवाईची मागणी: प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार भोजन उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी.