; नवउद्योजकांना १० लाखांपर्यंत अर्थसहाय्य मिळण्याची संधी
गोंदिया (प्रतिनिधी):गोंदिया शिक्षण संस्था संचलित धोटे बंधु विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथे आयबीएफसी (Incubation–cum–Business Facilitation Centre) च्या वतीने ‘GENESIS EiR 3.0 इनोव्हेशन रोडशो’ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांच्या चौकटीबाहेर जाऊन सर्जनशीलतेच्या माध्यमातून वास्तववादी आव्हानांवर मात करत नवउद्योजक बनण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे प्रोत्साहन देण्यात आले.
हा कार्यक्रम गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव व राज्यसभा खासदार राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन आणि प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंक्युबेशन सेलच्या समन्वयक डॉ. स्नेहा जैस्वाल यांनी प्रास्ताविक मांडले. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY Startup Hub) ‘GENESIS Entrepreneur-in-Residence (EiR)’ या उपक्रमांतर्गत पात्र नवउद्योजकांना १० लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य, इनक्युबेशन सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे व मार्गदर्शन:
-
उद्योजकतेला पाठबळ: IBFC गोंदिया केंद्र विद्यार्थ्यांना संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष व्यवसायापर्यंतच्या प्रवासात सर्व आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि उद्योगांशी थेट जोडणी उपलब्ध करून देणार.
-
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: IBFC चे केंद्र समन्वयक दीपांशु टेंभरे, इनफेड नागपूरच्या ‘टेक इनोव्हेशन अँड इनिशिएटिव्हज’ प्रमुख शिवांगी गोखले आणि टीम असोसिएट अभिषेक पटले यांनी स्टार्टअप इकोसिस्टम व इनक्युबेशन प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले.
-
सर्जनशीलतेला वाव: विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन कल्पनांतून उद्योग उभे करावेत, असे आवाहन वक्त्यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या संशोधन समितीचे प्रभारी डॉ. महेश कावळे आणि बी. वॉक. विभागाचे समन्वयक प्रा. यादव बोपचे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.





