गोंदिया : उपोषणानंतर पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी गेलेल्या गंगाबाई स्त्री रुग्णालयातील महिला अटेंडंटला जमादाराने कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याने वाद चिघळला आहे. या प्रकारामुळे दिवसभर कामावर रुजू होण्यासाठी दारोदार फिरणाऱ्या एका अटेंडंट महिलेने अखेर मुदतबाह्य ‘कफ सिरप’ प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २६) सायंकाळी ७वाजताच्या सुमारास घडली, रजनी संदीप कुंभरे (४१, रा. छोटा गोंदिया) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, जमादाराने धमकी दिल्याची तक्रार गुणवंता भिमराव साखरे (४२, रा. कुडता वॉर्ड क्र. ३, गोंदिया) यांनी शहर पोलिसांत दिली असून, पोलिसांनी जमादाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पुणे येथील स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून सुमारे ८० महिला अटेंडेंट विविध कामे करतात. विविध मागण्यांसाठी या अटेंडंटनी ११ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले होते. मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवारी (दि. २५) उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण संपल्यामुळे बुधवारपासून ((दि. २६)) जे अटेंडंट ज्या ठिकाणी काम करीत होते, त्याच ठिकाणी पुन्हा रुजू व्हावे, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांनी सांगितले होते. त्यामुळे सर्व अटेंडंट आपापल्या कामाच्या ठिकाणी सकाळपासून पोहोचले. मात्र, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील १४ महिला अटेंडंटच्या बाबतीत वेगळाच प्रकार घडल्याचा आरोप आहे.
६६ जणांना रुजू केले, मग १४ जणांवरच अन्याय का?
दरम्यान, उपोषणात सहभागी झालेल्या ८० अटेंडेंटपैकी ६६ जणांना कामावर रुजू करून घेण्यात आले, असा दावा संबंधित महिलांनी केला आहे. मात्र, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात काम करणाऱ्या १४ अटेंडंटना अद्याप कामावर रुजू करून घेण्यात आले नसल्याने त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या १४ जणांमध्ये गुणवंता साखरे (४२), अनिल पिपलेवार (४२, रा. संजयनगर), दुर्गा मुकेश नंदेश्वर (४९), दयावंती कमलप्रसाद भगत (४९, रा. मुरी), प्रियंका सतीश रामटेके (३९, रा. रमाईनगर, छोटा गोंदिया), प्रिया शैलेश बन्सोड (३४, रा. मुंडीपार), निकिता मानिक लोकडे (२७, रा. चान्ना बाक्टी, नवेगावबांध), पायल प्रभुलाल लिल्हारे (२६, रा. तुमखेडा खुर्द), शोभा खुर्मेंद्र लांजेवार (३५, रा. पुरगाव), संगीता संदीप हरिणखेडे (३२, रा. रावणवाडी),सेवकन धर्मेंद्र नेवारे (३९, रा. सावरी-नागरा) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यांच्याकडून रुग्णालयात अटेंडंट तसेच सफाईचे काम केले जाते.
‘काम बंद करा, घरी निघून जा’
गंगाबाई रुग्णालयातील १४ महिला अटेंडंट बुधवारी सकाळी ९.३० वाजता कामावर गेल्या असता तेथे जमादार म्हणून कार्यरत धीरज आनंद महावत (३६, रा. बाजपेई वॉर्ड) याने त्यांना काम बंद करून निघून जाण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पुन्हा गंगाबाई रुग्णालयात कामावर आल्यास ‘पाहून घेऊ’, तसेच त्यांच्या विरोधात न्यायालयात केस दाखल करण्याची धमकी दिल्याचे गुणवंता साखरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे महिला अटेंडंटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामावर रुजू करून घेतले जात नसल्याने त्या आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे गेल्या. आमदार अग्रवाल यांनी वैद्यकीय अधिष्ठाता तसेच संबंधित जमादाराशी मोबाइलवर संपर्क साधून महिला अटेंडंटना कामावर रुजू करून घेण्यास सांगितल्याचे सांगण्यात आले.





