— गोंदियात प्राथमिक शिक्षक संघाचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्र्यांना पाठवणार निवेदन
गोंदिया ,दि.२७:शालेय पोषण आहाराच्या अनुषंगाने मुख्याध्यापकांवर एफएसएसएआय (FSSAI) व एफबीओ (FBO) नोंदणीची सक्ती करू नये, तसेच जनगणना आणि बीएलओचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये त्वरित करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गोंदियाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी दिला आहे.
शाळा व्यापारी संस्था नाहीत
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा परिषद शाळा या शैक्षणिक संस्था असून त्या कोणत्याही प्रकारच्या व्यापारी संस्था नाहीत. मुख्याध्यापक हे व्यापारी नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यावर व्यापारी स्वरूपाची एफएसएसएआय नोंदणी लादणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. पोषण आहाराचा धान्यसाठा, इंधन आणि मदतनीसांचे मानधन शासन स्तरावरून दिले जात असताना, मुख्याध्यापकांकडे केवळ देखरेखीची जबाबदारी असावी, असे संघाने स्पष्ट केले.
अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार हटवा
२३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार शिजविणे हे अशैक्षणिक काम आहे. तसेच ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) कायद्यातील कलम २४ व २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यावर स्पष्ट निर्बंध आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना या अतिरिक्त प्रशासकीय कामांतून मुक्त करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत ही व्यवस्था चालवावी, अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय कर्तव्यासाठी सेवाविषयक न्याय द्या
शिक्षक नियमित अध्यापनासोबतच जनगणना व बीएलओ (BLO) यांसारखी राष्ट्रीय महत्त्वाची कर्तव्ये पार पाडतात. या कामांसाठी लागणाऱ्या वेळेचा मोबदला म्हणून शिक्षकांच्या अर्जित रजेची रीतसर नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका संघाने घेतली आहे.
लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्र्यांना घेरणार
या सर्व प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार आहेत. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.निवेदन देताना विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. यशोधरा सोनवाने, कार्याध्यक्ष कु. नितु डहाट, कोषाध्यक्ष राजेंद्र निंबारते, तालुका नेते योगानंद पटले, तालुका अध्यक्ष मोरेश्वर बडवाईक, तालुका सरचिटणीस चंदु दुर्गे यांच्यासह संजय बिसेन, विरेंद्र कावळे, कीर्तिमंत चांदेकर, अविनाश गणवीर, विजय मेश्राम व परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





