25 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home क्रीडा गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ

गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक व्यासपीठ

0
2

गोंदिया, दि.29 : गोंदिया जिल्ह्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली असून आज ही संकुले शेकडो खेळाडूंसाठी हक्काचे प्रशिक्षण केंद्र ठरत आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा मंडळांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

मरारटोली, गोंदिया येथे 6 हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेले जिल्हा क्रीडा संकुल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथे इंडोअर हॉल, जलतरण तलाव, पॅव्हेलियन इमारत, मुलांचे वसतिगृह, 400 मीटर धावनपथ, क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी आदी खेळांची मैदाने, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असून दररोज सुमारे 500 ते 600 खेळाडू या संकुलाचा लाभ घेत आहेत.

तिरोडा, सालेकसा, गोंदिया (कामठा), देवरी, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील क्रीडा संकुलेही कार्यान्वित झाली आहेत. या संकुलांमध्ये 200 मीटर धावनपथ, मल्टिपर्पज इनडोअर बॅडमिंटन हॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलची मैदाने, कार्यालयीन इमारती, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व संरक्षण भिंत अशी पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून खेळाडू नियमित सराव करत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात धावनपथाचे अपग्रेडेशन, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जिम हॉल, बॅडमिंटन हॉल व प्रसाधनगृहांचे आधुनिकीकरण, चेनलिंक फेन्सिंग, सोलर सिस्टीम, विद्युतीकरण, हायमास्ट दिवे, अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याची कामे वेगाने सुरू असून ती नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे तिरोडा येथे आर्चरी व कराटे, तर सालेकसा येथे कबड्डी व खो-खो या खेळांचे नियमित प्रशिक्षण सुरू आहे. अर्जुनी मोरगाव येथील तालुका क्रीडा संकुलात मल्टिपर्पज गेम हॉल, 200 मीटर धावनपथ, संरक्षण भिंत तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल कोर्टची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र संबंधित जागेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने पुढील विकासकामे सध्या स्थगित आहेत.सर्व क्रीडा संकुलांमध्ये सकाळी 6.30 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शकांमार्फत व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कराटे व आर्चरीचे नियमित प्रशिक्षण दिले जात असून शेकडो मुले-मुली त्यात सहभागी होत आहेत.

जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गोंदिया जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी दिली. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व नागरिकांनी क्रीडा संकुलांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि “क्रीडा हीच जीवनशैली” हा संदेश समाजात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.