गोंदिया: राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आरोग्य निर्देशांक रँकिंगमध्ये गोंदिया जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकावले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) मानांकनात गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तब्बल ४६.५७ गुण मिळवून राज्यात अव्वल क्रमांक मिळवला.
पुणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांच्या हस्ते गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रँकिंगमधील टॉप ५ जिल्हे
राज्यस्तरावर पहिल्या तिमाहीतील गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आलेली क्रमवारी खालीलप्रमाणे आहे:
| क्रमांक | जिल्हा | प्राप्त गुण |
| १ | गोंदिया | ४६.५७ |
| २ | नागपूर | ४५.७९ |
| ३ | वर्धा | ४५.१७ |
| ४ | अकोला | ४४.३९ |
| ५ | गडचिरोली | ४४.१४ |
सांघिक कामगिरीचे यश
माता व बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, नियमित व विशेष लसीकरण मोहिमा, RCH ऑनलाइन पोर्टल नोंदणी, क्षयरोग नियंत्रण आणि आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत दिलेल्या मोफत आरोग्य सेवा अशा विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली.
जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, २६३ आरोग्य उपकेंद्रे, ४ आपला दवाखाना आणि १७ नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेने हे यश संपादन केले आहे.
“हा बहुमान गोंदिया जिल्ह्यातील सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका आणि डेटा एंट्री ऑपरेटर्सच्या सांघिक मेहनतीचा परिणाम आहे. आगामी काळात लोकसहभागातून अधिक प्रभावी आणि दर्जात्मक आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर राहील.”
— झेनिथ दोंतुला, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया
आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग, सीमावर्ती भौगोलिक रचना आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशी आव्हाने असतानाही गोंदिया आरोग्य विभागाने मिळवलेले हे यश संपूर्ण नागपूर विभागासाठी भूषणावह ठरले आहे.





