24.2 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आपल्या कलागुणांना वाव देऊन मोठी स्वप्ने पाहावीत – आमदार राजकुमार...

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आपल्या कलागुणांना वाव देऊन मोठी स्वप्ने पाहावीत – आमदार राजकुमार बडोले

0
6

बेहळीटोला (चिरचाडी) प्राथमिक शाळेला आमदार बडोलेंची भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद
सडक अर्जुनी-अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील बेहळीटोला (चिरचाडी) येथील प्राथमिक शाळेला आमदार इंजी. राजकुमार बडोले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आवडी-निवडी, कलागुण, जिज्ञासा आणि भविष्यातील स्वप्नांविषयी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळेच्या माध्यमातून घडते. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करण्यासोबतच आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. आजची मुले ही उद्याच्या समाजाची आणि देशाची जबाबदार पिढी आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत संस्कार, आत्मविश्वास आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, त्यांच्या प्रश्नांमधील जिज्ञासा आणि निरागसता पाहून आपल्या प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे आमदार बडोले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची व आवडीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देत आमदारांशी संवाद साधला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, शैक्षणिक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही आमदार बडोले यांनी नमूद केले.
‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील स्वप्नाला बळ देणे आणि त्याच्या गुणवत्तेला योग्य संधी उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,’ असे सांगत आमदार बडोले यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करण्याचे, शिक्षकांचा आदर करण्याचे आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान सडक अर्जुनी पंचायत समिती उपसभापती निशाताई काशिवार, डॉ. अविनाश काशिवार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती), भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, शिशिर येडे, शाळेचे शिक्षक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार बडोले यांच्या या शाळा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची आणि भविष्यातील वाटचालीची जाणून घेतलेली ही भेट प्रेरणादायी ठरली.