25.2 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home Top News नागपुरात खळबळ: शहरातील १८ नामांकित शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी

नागपुरात खळबळ: शहरातील १८ नामांकित शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी

0
37

; कडेकोट पोलीस बंदोबस्त, शाळांना तातडीने सुट्टी

नागपूर (विशेष प्रतिनिधी):उपराजधानी नागपुरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, शहरातील तब्बल १८ नामांकित शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज (३१ ऑगस्ट) सर्व संबंधित शाळांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालक आणि नागरिक वर्गात कमालीची घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी नागपुरातील नामांकित १८ शाळा आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर एक संशयास्पद संदेश प्राप्त झाला होता. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी हे परिसर बॉम्बने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. आज तीच तारीख असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा व्यवस्थापनाने पालकांना तातडीने सूचना देऊन विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन; पोलीस तपासाला वेग

नागपूर पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून सायबर सेलच्या मदतीने तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक तपासात हा वादग्रस्त ई-मेल फ्रान्स आणि बांगलादेश येथून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. धमकीचा संदेश मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) सर्व १८ शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची बारकाईने तपासणी केली. सुदैवाने, या झाडाझडतीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत.

नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ई-मेलमधील तारखेनुसार आज ३१ ऑगस्ट रोजी नागपूर पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संबंधित ठिकाणी आणि संवेदनशिल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.नागरिकांनी आणि पालकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन नागपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.