भंडारा, दि. 01 : नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे नेत्रदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा शल्यचिकित्सक संदीप कुमार गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रभात फेरीचा शुभारंभ अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर आणि जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रेखा धकाते यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अतुलकुमार टेंभुर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. दुर्गेश पशिने, नेत्रतज्ज्ञ डॉ. करुणा खोब्रागडे, डॉ. प्रिया सयाम, आय डोनेशन कौन्सिलर सोनाली लांबट, वंदना शेंडे, आहारतज्ज्ञ विनिता चकोले, डॉ. बाडेबुचे तसेच नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदान जनजागृतीचे फलक हातात घेऊन विविध घोषणांद्वारे नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. “नेत्रदान करा, अंधत्व दूर करा”, “मृत्यूनंतरही द्या कोणाला तरी दृष्टी”, “नेत्रदान हेच श्रेष्ठ दान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नेत्रदानाबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. नेत्रदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश प्रभात फेरीच्या माध्यमातून देण्यात आला.नेत्रदान करण्यास इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





