-तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवातून रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित
गोंदिया : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.महोत्सवात महिला बचत गट व उमेदच्या स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी विविध रानभाज्या व त्यांपासून तयार केलेल्या पाककृतींचे स्टॉल उभारले होते. पाककला स्पर्धेतील विविध स्टॉलचे परीक्षण व मूल्यांकन डॉ. तेजेश्वरी टेंभरे यांच्यासह परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले.
एस. एस. गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील डॉ. तेजेश्वरी टेंभरे यांनी त्यांच्या रानभाज्यांवरील संशोधन प्रकल्पांतर्गत समुदायस्तरावर पोषणविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सहभाग नोंदविला. त्यांनी उपस्थित महिला, नागरिक व मान्यवरांना विविध रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. टेंभरे यांनी विशेषतः ३ ते ६ वर्षे तसेच ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर स्थानिक रानभाज्यांचा उपयोग कसा करता येईल, याबाबत माहिती दिली. रानभाज्यांवर योग्य प्रक्रिया करून त्यांचा विविध पौष्टिक पूरक आहार व पाककृतींमध्ये समावेश करून कुपोषण कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच अंगणवाडी व शालेय पोषण आहारामध्ये स्थानिक रानभाज्यांचा उपयोग करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भर दिला.
महोत्सवामध्ये एस. एस. गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रानभाज्यांचे विशेष माहिती व प्रदर्शन स्टॉल उभारला होता. यामध्ये विविध रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग व प्रति १०० ग्रॅममधील प्रमुख पोषणमूल्यांची माहिती फ्लॅश कार्ड व माहितीपत्रकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. तसेच रानभाज्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक पाककृतींचेही प्रदर्शन करण्यात आले.या उपक्रमातून रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यविषयक महत्त्व आणि कुपोषण निर्मूलनासाठी समुदायस्तरावर त्यांचा संभाव्य उपयोग याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमास श्रीमती दीपाताई चंद्रिकापुरे, मुनेश रहांगडाले, अजित आडसुळे, निलेश कानवडे, रूपेश मेश्राम, महेंद्र ठोकळे, नेहा आढाव यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





