25.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home विदर्भ “ नकारात्मकता ही सकारात्मकता म्हणून स्वीकारा ” – प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले

“ नकारात्मकता ही सकारात्मकता म्हणून स्वीकारा ” – प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले

0
17

सेवानिवृत्ती प्रसंगी डॉ ईश्वर मोहुर्ले यांचा सपत्नीक सत्कार
संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ. मोहुर्ले यांच्या हस्ते संपन्न
अर्जुनी मोरगाव – “ आपण जर नकारात्मकतेने विचार केला तर आपली मनोवृत्ती ही सुद्धा नकारात्मकच होईल. आणि यामुळे आपण यशापासून दूर होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून आपल्या अवतीभवती जि नकारात्मकता असते किंवा कोणी आपल्याशी नकारात्मक वागत असेल तरी त्याचा स्वीकार आपण सकारात्मक करून घेतला पाहिजे. यामुळे आपल्या मनात सकारात्मकता वाढेल आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा होईल.” असे मत प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी व्यक्त केले. ते स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात श्री दुर्गा शिक्षण संस्था आणि प्राध्यापक परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुकेश जायस्वाल, प्रमुख अतिथी सचिव लुनकरण चितलांगे, सहसचिव मयंक जायस्वाल, कोषाध्यक्ष मनीष जायस्वाल, रातुम नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नीलकंठ लंजे, डॉ, नामदेव कोकोडे, डॉ. देवदत्त तारे, डॉ. श्रीराम गहाणे, डॉ. नरेंद्र आरेकर आणि सौ. अर्चना मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. शिवप्रसासाद जायस्वाल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. नीलकंठ लंजे यांनी डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या प्रशासकीय कार्याचा आढावा घेतला. डॉ. मोहुर्ले यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे कुलसचिव तसेच विविध पदे भूषविली, त्यांच्या अनुभवाचा फायदा या महाविद्यालयाला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नामदेव कोकोडे यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत डॉ. मोहुर्ले हे अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही आपल्या कार्यकुशलतेमुळे शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.यावेळी श्री दुर्गा शिक्षण संस्थेच्या वतीने मुकेश जायस्वाल, लुनकरण चितलांगे, मयंक जायस्वाल यांच्या हस्ते डॉ. ईश्वर मोहुले आणि सौ. अर्चना मोहुर्ले यांचा शाल, गौरव पत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राध्यापक परिषदेच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून मुकेश जायस्वाल यांनी डॉ. मोहुर्ले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी या महाविद्यालयाला एका वेगळ्या उंचीवर पोचविले. ग्रामीण विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश डोंगरवार, संचालन डॉ. लक्ष्मीकांत कापगते आणि आभार डॉ. आशिष कावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.