झाडीबोलीतील प्रसिद्ध कवी लोकरामजी शेंडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
गोरेगाव : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे विभागाच्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना साहित्य, कविता आणि स्थानिक बोलीभाषेची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथे ‘कवी आपल्या भेटीला’ या विशेष उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी झाडीबोली भाषेतील कवी लोकरामजी शेंडे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये ‘सरावन मईन्यात’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. ही कविता झाडीबोली या स्थानिक बोलीभाषेत असून विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेबरोबरच विविध बोलीभाषांतील साहित्याचा परिचय व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात कवी लोकरामजी शेंडे यांनी विद्यार्थ्यांसमोर ” सरावन मईन्यात” ही कविता अत्यंत प्रभावी व रसाळ शैलीत सादर केली. कवितेतील शब्दरचना, झाडीबोलीतील वैशिष्ट्यपूर्ण शब्द, निसर्गचित्रण तसेच कवितेचा भावार्थ त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत उलगडून सांगितला. कवीच्या मुखातून कविता ऐकण्याचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला.
यावेळी कवी लोकरामजी शेंडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. कविता कशी सुचते, कवितेसाठी विषयांची निवड कशी करावी, आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून व दैनंदिन जीवनातील अनुभवांतून कवितेची निर्मिती कशी करता येते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कल्पनेतून कविता तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
कवींच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कविता लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झाली. झाडीबोलीसारख्या समृद्ध स्थानिक बोलीभाषेतील साहित्याची ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील भाषा, संस्कृती आणि साहित्यिक परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे, पर्यवेक्षक ए. एच. कटरे,दिनेश अंबादे सर,गौतम सर,वाय के चौधरी,आर वाय कटरे,एस आर राहांगडाले,के एस बारेवार, एम डी राहांगडाले,ए एस बावनथडे,एस आर मांढरे,एस जी दमाहे,व्ही एच कटरे,डी पी राहांगडाले,झेड जे भोयर, बी बी राहांगडाले,अभय राहांगडाले,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आय. बी. पटले यांनी केले. उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘कवी आपल्या भेटीला’ हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कवींच्या सहवासातून कविता समजून घेण्याची, बोलीभाषेतील साहित्याचा आस्वाद घेण्याची तसेच स्वतःमध्ये दडलेल्या कवीला जागृत करण्याची प्रेरणा मिळाली.





