# बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित होणार नाही; सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सूचना
# आमगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा; भागी दुर्घटनेचीही दखल
आमगाव |आमगाव तालुक्यातील आरोग्य सुविधांचा गंभीर प्रश्न, बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावित स्थलांतराबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम तसेच देवरी तालुक्यातील भागी येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
यशवंत मानकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आवश्यक सूचना दिल्याची माहिती आहे. आरोग्य केंद्र बंद अथवा स्थलांतरित करण्याऐवजी त्याठिकाणी आवश्यक सुविधा वाढवून नागरिकांना अधिक सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे आमगाव शहरासह बनगाव, रिसामा, पदमपूर, बिरसी, माल्ही, कुंभारटोली व किडंगीपार परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत असलेल्या या परिसरातील नागरिकही उपचारासाठी या केंद्रावर अवलंबून आहेत. केंद्राच्या स्थलांतराबाबत चर्चा सुरू झाल्याने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
यशवंत मानकर यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणीही केली. आमगावचे भौगोलिक स्थान आणि सीमावर्ती भागातील नागरिकांची आरोग्यसेवेसाठी असलेली गरज लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या मागणीचीही पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दखल घेत आमगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक सूचना व पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि विविध उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी देवरी तालुक्यातील मौजा भागी येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू व तीन मजूर जखमी झाल्याच्या घटनेबाबतही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. संबंधित बांधकामाबाबत पूर्वी प्रशासनाकडून कारवाई व बांधकाम थांबविण्याचे निर्देश देण्यात आले असतानाही दुर्घटना घडल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला.या गंभीर प्रकरणाचीही पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दखल घेत मृतक व जखमी मजुरांच्या प्रकरणात आवश्यक ती चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांच्या निवेदनावर पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याने आमगाव व देवरी परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित होणार नसल्याच्या आश्वासनामुळे नागरिकांच्या आंदोलनाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून, आता केंद्रातील बंद पडलेल्या व आवश्यक आरोग्य सुविधा सुरू करून त्याचे आधुनिकीकरण करण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा केली आहे.तसेच आमगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू होते आणि भागी येथील दुर्घटनेतील दोषींवर कोणती कारवाई करण्यात येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





