‘सायकलिंग संडे’; जिल्हा क्रीडा संकुल ते नागरा धामपर्यंत रॅली
गोंदिया, ४ सप्टेंबर-राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अथर्व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवारी ३० ऑगस्ट रोजी ‘सायकलिंग संडे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. उत्साहपूर्ण वातावरणात सायकलस्वारांनी नागरा धामपर्यंत सायकल चालवत क्रीडा व आरोग्याचा संदेश दिला.
खेळ म्हणजे केवळ मैदानावरील स्पर्धा नसून निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा आधार आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेषतः युवक-युवतींमध्ये सायकलिंग, नियमित व्यायाम आणि क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीत क्रीडाप्रेमी, विविध खेळांतील खेळाडू, युवक-युवती तसेच आरोग्याबाबत जागरूक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायकलिंगच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव अतुल बिसेन यांच्यासह पंकज बोरकर, जितेंद्र पालंदुरकर, लवकुश गजभिये, उज्ज्वल बाणासुरे, अक्षय बनकर, प्रतीक लाडेकर, राजा नेवरे, मंगेश कावरे, शुभम पिसोडे, उज्ज्वल हुमे, आदित्य वैद्य, भाग्यश्री बनकर आणि काजल पुराम यांनी सहकार्य केले.





