गोंदिया : गोंदिया शहराच्या प्रभाग क्रमांक २ मधील रेलटोली परिसरात गेल्या १३ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडलेल्या भव्य ऑडिटोरियमच्या कामाला आता लवकरच गती मिळणार आहे. आज गोंदिया दौऱ्यावर असताना पालकमंत्री इंद्रनील नाईक आणि माननीय खासदार राजेंद्र जैन यांनी या अपूर्ण ऑडिटोरियमच्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. केवळ कागदावर राहिलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या पाहणीदरम्यान दोन्ही नेत्यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. वर्षानुवर्षे रखडलेल्या या कामाबद्दल गांभीर्य व्यक्त करत, हे काम वेळेत आणिदर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी जबाबदारी निश्चित करून त्वरित आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गोंदिया शहराच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी हे ऑडिटोरियम अत्यंत महत्त्वाचे साधन ठरणार असल्याने, या निर्णयामुळे गोंदियाकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी केतन तुरकर, संजीव राय, अनूज जायसवाल, अरविंद चौरसिया, ज्वाली पटेल, पीनल पटेल, अमित गुप्ता, प्रशांत मिश्रा, रोहित करोट, संजीव गुप्ता, सुमित गुप्ता, अंकित यादव, लक्की पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या पुढाकारामुळे आता प्रशासकीय हालचालींना वेग येईल आणि हे भव्य ऑडिटोरियम लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, अशी भक्कम आशा निर्माण झाली आहे.





